
पुणे : पादचारी दिनानिमित्त बुधवारी (११ डिसेंबर) लक्ष्मी रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. लिंबराज महाराज चौक (नगरकर तालीम चौक) ते गरुड गणपती चौक दरम्यान सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
पुणे महापालिकेकडून ११ डिसेंबर रोजी पादचारी दिन साजरा करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने लक्ष्मी रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून, विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ११ डिसेंबर रोजी सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत नगरकर तालीम चौक ते गरुड गणपती चैाक दरम्यान वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे असे आवाहन करण्यात आले आहे.
पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे – लक्ष्मी रस्त्याने नगरकर तालीम चौकातून टिळक चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी नगरकर तालीम चौकातून डावीकडे वळून बाजीराव रस्ता, अप्पा बळवंत चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. कुमठेकर रस्त्याने लक्ष्मी रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांनी शनिपार चौक (चितळे कॉर्नर) येथून वळून बाजीराव रस्तामार्गे अप्पा बळवंत चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. नारायण पेठेतील लोखंडे तालीम चौकातून लक्ष्मी रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांनी केळकर रस्ता, टिळक चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.
