नवी दिल्ली : रॉकेट संशोधक व्ही. नारायणन यांची अवकाश विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. अवकाश विभागाचे सध्याचे सचिव आणि ‘इस्राो’चे प्रमुख एस सोमनाथ यांचा कार्यकाळ पुढील आठवड्यात संपत आहे. अवकाश विभागाच्या सचिवांकडेच ‘इस्राो’चे प्रमुखपदही असते.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने व्ही. नारायणन यांची अवकाश विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे असे मंगळवारी जारी करण्यात आलेल्या सरकारी आदेशात नमूद करण्यात आले. ही नियुक्ती १४ जानेवारीपासून लागू होणार असून दोन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेश येईल त्यानुसार असेल असे आदेशात म्हटले आहे. नारायणन हे इस्राोमधील महत्त्वाचे संशोधक आहेत. त्यांना जवळपास ४० वर्षांचा अनुभव आहे.



