पीटीआय, वॉशिंग्टन
भारतीय उद्याोजक गौतम अदानी यांची चौकशी करण्याच्या बायडेन प्रशासनाच्या निर्णयाला रिपब्लिकन पक्षाच्या एका काँग्रेस सदस्याने आव्हान दिले आहे. ‘‘अशा प्रकारच्या कारवाईमुळे महत्त्वाच्या भागीदारांबरोबरील संबंधांचे नुकसान होते,’’ असे त्यांनी म्हटले आहे.
अमेरिकेचे अॅटर्नी जनरल मेरिक बी. गार्लंड यांना लिहिलेल्या खरमरीत पत्रात लान्स गूडेन या काँग्रेस सदस्याने म्हटले आहे की, ‘‘भारताला केलेली प्रत्यार्पणाची विनंती भारताने मान्य केली नाही, तर अमेरिका काय करेल? न्याय विभागाच्या अशा निवडक कृतीमुळे भारतासारख्या महत्त्वाच्या देशाबरोबरील संबंधांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. आशिया-प्रशांत महासागर क्षेत्रामध्ये भारत हा अमेरिकेसाठी एक महत्त्वपूर्ण देश आहे. न्यायाधिकारक्षेत्र पुरेसे नसताना आणि अमेरिकेच्या हितसंबंधांशी फारसे संबंध नसलेल्या प्रकरणांऐवजी न्याय विभागाने अमेरिकेतील वाईट कृत्यांसाठी शिक्षा देण्यावर आपले लक्ष केंद्रित करावे. अमेरिकेत अब्जावधींची गुंतवणूक आणि अमेरिकी नागरिकांसाठी हजारोंची रोजगारनिर्मिती करणाऱ्या देशांना लक्ष्य करणे अमेरिकेसाठीच दीर्घ काळासाठी नुकसानदायक ठरेल.’’
बायडेन प्रशासनाचे यांसारखे निर्णय पाहता केवळ अध्यक्ष ट्रम्प यांच्यासमोर केवळ अडथळे निर्माण करण्याचे उद्दिष्ट यामागे दिसत असल्याचे गूडेन म्हणाले. त्यांनी पत्रात लिहिले की, ‘‘अदानी प्रकरणातील आरोप खरे जरी ठरले, तरी हे प्रकरण तडीस नेण्यात अपयश येईल. या प्रकरणात कथित लाच भारतातील सरकारी अधिकाऱ्यांना भारतातील कंपन्यांच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी भारतात दिली आहे. यात एकाही अमेरिकी पक्षकाराचा थेट समावेश नाही.’’ सौर ऊर्जा कंत्राटांसाठी उद्याोजक गौतम अदानींनी भारतात २६.५ कोटी डॉलर इतकी लाच दिल्याचा आरोप आहे.



