पुणे : ‘बीडमधील हत्या प्रकरणात जो कोणी दोषी सिद्ध होईल, त्यावर कारवाई होईल. तसेच, पक्ष वगैरे न पाहता, वरिष्ठ पातळीवरील कोणी व्यक्ती दोषी असल्यास गय करण्याचे कारण नाही, असेही मी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी येथे स्पष्ट केले.
पुणे शहर आणि जिल्ह्यासंबंधीच्या विविध मुद्द्यांबाबत पवार यांनी गुरुवारी बैठका घेतल्या. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विचारले असता, ते म्हणाले, ‘महाराष्ट्रात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. ही निर्घृणपणे झालेली हत्या आहे. यात सरकारने लक्ष घातलेले आहे. एसआयटी, सीआयडी, न्यायालय अशा तीन यंत्रणांकडून चौकशी-तपास सुरू आहे. हव्या तर आणखी यंत्रणा लावाव्यात. या प्रकरणी दोषींना पाठीशी घातले जाणार नाही. कठोरातील कठोर शिक्षा केली जाईल.’
‘आरोपी सापडायला विलंब लागला. मात्र, कोणी कोणाला फोन केले हे सगळे आता समजते. तीन यंत्रणा अत्यंत बारकाईने तपास करत आहेत. अहवालात काही तफावत झाल्यास प्रत्येकाच्याच विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होणार आहे. तसेच, या प्रकरणी राजकारण आणू देणार नाही,’ असेही पवार यांनी नमूद केले.
ते म्हणाले, ‘विरोधी आणि सत्ताधारी पक्षातील काहींनी बोलताना कोणावर अन्याय होऊ नये ही खबरदारी घेतली पाहिजे. आरोप करण्यापेक्षा तपास यंत्रणांना पुरावे द्यावेत. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा झाली आहे.



