
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला 2024 ला हत्या करण्यात आली. या हत्येचे पडसाद अद्यापही राज्यात उमटत आहेत. कारण आज सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आक्रमक होत स्वत: पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले आहे. ग्रामस्थांच्या व मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगेंच्या उपस्थितीत हे आंदोलन तब्बल दोन तास चालू होते. मात्र यावेळी धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगे पाटलांना मिठी मारत जोरजोरात हंबरडा फोडला.
आरोपींना लवकरात लवकर फाशी द्या :
आंदोलनादरम्यान धनंजय देशमुख यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्या भावाला ज्यांनी संपवलं. ज्यांनी कटकारस्थान केलं. त्यांना लवकरात लवकर फाशी द्या”, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे. मात्र धनंजय देशमुख यांनी टाकीवर चढून आंदोलन करत असताना मनोज जरांगे पाटील यांनी त्यांची समजूत काढण्याचा देखील प्रयत्न केला आहे.
धनंजय देशमुखांच्या मागण्या काय?
– मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडवर 302 चा गुन्हा दाखल करून मोक्का लावण्यात यावा.
– याप्रकरणातील फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे याला तात्काळ अटक करावी.
– संतोष देशमुख हत्या प्रकरणी शासकीय वकील म्हणून उज्वल निकम किंवा सतीष मानशिंदे यांची तात्काळ नियुक्ती करावी.
– याशिवाय SIT कमिटीमध्ये पंकज कुमावत या अधिकाऱ्याची तात्काळ नियुक्ती करावी.
– या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला आहे? याची माहिती संतोष देशमुख कुटुंबियांना देण्यात यावी.
– केजचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना बडतर्फ करून सहआरोपी करण्यात यावे, या विविध मागण्यांसाठी आज आंदोलन करण्यात आले आहे.



