पुणे : राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांच्या प्रस्तावांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी शाळेला प्रस्ताव देण्यासाठी २४ जानेवारीपर्यंत आणि शाळांनी विभागीय मंडळाकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी याबाबत परिपत्रकाद्वारे माहिती दिली. मंडळाशी संलग्नित सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक यांना शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या, लोककला प्रकारात सहभाग घेतलेल्या सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याचे प्रस्ताव शाळेकडे सादर करण्यासाठी १५ डिसेंबर, माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी १५ जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, शासकीय रेखाकला (एलिमेंटरी, इंटरमिजिएट) परीक्षा २०२४चा निकाल जानेवारी २०२५च्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार असल्याने शास्त्रीय कला, चित्रकला आणि लोककला प्रस्ताव स्वीकारण्याच्या मुदतीमध्ये वाढ करण्याची मागणी विविध संघटनांनी राज्य मंडळाकडे केली होती. त्यानुसार संबंधित प्रस्तावांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शास्त्रीय कला, चित्रकला आणि लोककलेचे परिपूर्ण प्रस्ताव विद्यार्थ्यांनी शाळेकडे सादर करण्यासाठी २४ जानेवारी, तर शाळांनी विभागीय मंडळाकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी ३१ जानेवारीची मुदत देण्यात आली आहे.




