
नाशिक: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील लेखी परीक्षांचा तिसरा टप्पा राज्यातील १९७ केंद्रांवर १८ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. मागील सत्रात दोन वेळा प्रश्नपत्रिका फुटल्याने खबरदारी म्हणून तिसऱ्या टप्प्यात तृतीय वर्ष एम.बी.बी.एस. आणि अंतिम वर्ष एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका प्रायोगिक तत्त्वावर ऑनलाइन संगणक प्रणालीद्वारे केंद्रांवर परीक्षा सुरू होण्याआधी पाठविण्यात येतील, अशी माहिती परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी दिली.
या परीक्षेला सुमारे ९०,८७३ विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत. मागील सत्रात परीक्षा सुरू होण्याआधी दोन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या होत्या. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आताचा प्रयोग यशस्वी झाल्यास सर्वच अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका परीक्षेच्या दिवशी केंद्रांवर पाठविण्यात येतील. प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांचे संपूर्ण डिजिटलायझेशन करण्याचा मानस असल्याचे डॉ. कडू यांनी सांगितले. त्यामुळे परीक्षार्थींनी केंद्रांवर एक तास आधी म्हणजेच सकाळ सत्रासाठी सकाळी नऊ तर दुपारच्या सत्रासाठी एक वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.



