
पुणे : ललित पाटीलचा ड्रग उद्याोग आणि कुरकुंभ एमआयडीसीतील मेफेड्रॉनचा कारखाना पुणे पोलिसांनी उद्ध्वस्त करून हजारो कोटींचे मेफेड्रॉन जप्त केले होते. त्यानंतर शहरातील ‘मेफेड्रॉन तस्करी’ थांबल्याचे वाटत असतानाच शहरात विक्रीसाठी आणलेले तब्बल २२ लाखांचे ११० ग्रॅम मेफेड्रॉन बुधवारी (दि.१५) गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केले.
पोलीस अंमलदार आझाद पाटील यांना अग्रेसन स्कूलच्या सार्वजनिक रस्त्यावर एकजण मेफेड्रॉन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली, त्यानंतर पथकाने छापा टाकून ही कारवाई केली. या प्रकरणात ड्रग विक्री करणारा अहमद वाहिद खान आणि ड्रगचा पुरवठा करणारा हबीब शमशुद्दीन सय्यद या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नितील कुमार नाई आदींनी कारवाई केली.




