मुंबई : मस्साजोगचे (जि. बीड) सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सध्या सीआयडी, विशेष चौकशी पथक आणि न्यायालयीन अशी तिहेरी चौकशी सुरू आहे. अजून चौकशीत कोणाच्या सहभागाबाबत काहीच निष्कर्ष आलेला नाही. कोणी मागणी केली म्हणून लगेचच राजीनामा घेतला जाणार नाही. पुरावे असल्याशिवाय कारवाई केली जाणार नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा फेटाळून लावली.
भाजप आमदार सुरेश धस ह ेमुंडे यांच्या राजीनाम्याची वारंवार मागणी करीत असले तरी मी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतो. सामान्य कार्यकर्ते काय बोलतात याकडे लक्ष देत नाही, असेही अजित पवार यांनी सांगितले. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सरकारवर दबाव वाढला आहे. समाजसेविका अंजली दमानिया यांनी मुंडे यांच्या गैरव्यवहारांची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन दिली.
मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत असली तरी अजित पवारांनी त्यांना पुन्हा अभय दिले आहे. चौकशीत सहभागाबाबत स्पष्टता येत नाही, तोपर्यंत कोणाचाही राजीनामा घेतला जाणार नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.



