बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाची ही जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजना अवर्षणग्रस्त क्षेत्रात सक्रिय आहे. या योजनेला खडकवासला प्रकल्पातून पाणी मिळते. या योजनेतील कालवे उघड्या पद्धतीचे आहेत. डोंगराळ भागातील मुरमाड जमिनीमुळे कालव्यांमधून पाणीगळती मोठी होते. कालव्यांची कामे पंचवीस वर्षे जुनी आहेत. पाणी उपलब्ध न झाल्यामुळे कालव्यांचे नुकसान झाले आहे.
ही योजना पूर्णक्षमतेने कार्यान्वित न झाल्याने या परिसरातील चाळीसहून अधिक गावांना टंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेतकरी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे या योजनेतून पाणी मिळावे, अशी मागणी केली होती. मूळ नियोजनानुसार कालवे व वितरण व्यवस्थेकरिता 415 हेक्टर भूसंपादन करावे लागणार होते.



