पुणे : बँकॉकला खासगी विमानाने निघालेल्या माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाला आपण पुण्यात लँड होणार याबद्दल माहितीच नव्हती. मात्र, पुण्यात विमानतळावर उतरल्यानंतर त्याला धक्काच बसला. मात्र, अवतीभोवती विमानतळावर पोलिसांचा गराडा दिसल्यानंतर व माहिती घेतल्यानंतरच आपल्या वडिलांनीच यंत्रणा कामाला लावून त्याला पुन्हा पुण्यात बोलविल्याचे समजले. त्यामुळे ‘जाना था बँकॉक, पहुँच गये… पुणे’ अशीच काहीशी परिस्थिती सोमवारी ऋषिराज सावंत यांच्याबाबत पाहायला मिळाली.
ऋषिराज तानाजी सावंत (वय 32) याचे अपहरण करण्यात आल्याच्या संशयानंतर राहुल सुभाष करळे (वय 47, रा. सावंत विहार, मोरे बागेजवळ, कात्रज) यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. माजी मंत्री सावंत यांना आपल्या मुलाचे ऋषिराजचे अपहरण झाल्याचा संशय आला होता, तसेच तो बँकॉकच्या दिशेने खासगी विमानाने चालला असल्याची माहिती त्यांना नंतर मिळाली. मात्र, त्याच्यासोबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी त्यांनी खासगी विमान तत्काळ परत बोलाविण्याचे ठरविले. पुढील यंत्रणेला कार्यवाही करण्यासाठी अडथळा येऊ नये, यासाठी तत्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्या एफआयआरच्या माध्यमातून केंद्रीय मंत्र्यांमार्फत विमानतळ प्रशासनाशी (एटीसी) संपर्क साधण्यात आला.
वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी वरिष्ठ पातळीवर संवाद साधत कोणताही अनुचित प्रकार टाळण्याच्या दृष्टीने पावले उचलली. ‘एटीसी’शी संपर्क साधल्यानंतर त्यांनी ज्या खासगी विमानाने ऋषिराज हा बँकॉककडे रवाना झाला होता. त्या विमानातील वैमानिकाशी त्यांनी रेडिओ लहरीद्वारे संपर्क साधला. तसेच ऋषिराज व त्याच्या मित्राला कोणतीही खबर लागू न देता विमान पुन्हा भारताच्या दिशेने फिरविण्यास सांगितले. त्या वेळी विमान अंदमान- निकोबार बेटांवरील पोर्ट ब्लेअरच्या परिसरात उडत होते. उच्च पातळीवर विमान परत फिरविण्याचा संदेश वैमानिकांना देण्यात आला. त्यानंतर विमान पुन्हा भारताच्या दिशेने वळविण्यात यावे, असे सांगण्यात आले.
काही दिवसांपूर्वीच केला होता दुबई दौरा
ऋषिराज याने काही दिवसांपूर्वीच दुबईचा बिझनेस दौरा केला होता. वडील आपल्याला लगेच बँकॉक येथे जाण्यास परवानगी देणार नसल्यानेच त्याने मित्रांना विश्वासात घेऊन व त्यांच्याबरोबर जाण्याच्या हेतूने खासगी विमान बुक केल्याचे निष्पन्न झाले असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. तसेच, खासगी विमानासाठी त्याने तब्बल 78 लाख 50 हजारदेखील खर्च केल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले आहे.


