सातारा : सातारा तालुक्यातील शिवथर आणि वडूथ गावातील स्टेट बँक (state bank) आणि बँक ऑफ इंडियाचं (bank of india) एटीएम गॅस कटरच्या सहाय्यानं फोडून चोरट्यांनी १७ लाखांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी (१६ फेब्रुवारी) पहाटे घडलेल्या या घटनेनं सातारा तालुक्यात एकच खळबळ उडाल्याचं बघायला मिळतंय. दरम्यान, चोरीचा घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
एटीएम फोडण्यासाठी गॅस कटरचा वापर : मिळालेल्या माहितीनुसार, सातारा तालुक्यातील शिवथर गावातील बस थांब्यानजीक स्टेट बँकेचं एटीएम आहे. रविवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास चारचाकी गाडीतून आलेल्या चोरट्यांपैकी तिघांनी एटीएमच्या रुममध्ये प्रवेश केला. शटर खाली ओढून गॅस कटरनं एटीएम मशीन फोडत ७ लाखांची रोकड काढली.
पोलीस घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच चोरटे पसार : बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून ७ लाख तर स्टेट बँकेच्या एटीएममधून १० लाख रुपयांची रोकड लंपास करून चोरटे अवघ्या काही वेळात कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशनच्या दिशेनं पसार झाल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झालं.
चोरीच्या घटनेबद्दल उलटसुलट चर्चा : बँक ऑफ इंडियाची एटीएम सेवा दहा वर्षांपासून सुरू होती. मात्र, कमी वापरामुळं एटीएम नुकतंच बंद करण्यात आलं होतं. त्या एमटीएम मशीनमधील रोकड स्टेट बँकेच्या एटीएममध्ये भरण्यात आली होती. ही माहिती कशी लिक झाली? याबद्दल परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
दहा ते पंधरा लाख जळून खाक : काही महिन्यांपूर्वी अशीच एक घटना छत्रपती संभाजीनगरात घडली होती. या घटनेत छत्रपती संभाजीनगरच्या माळीवाडा परिसरात असलेलं एसबीआय बँकेचं एटीएम गॅस कटरनं फोडल्यामुळं दहा ते पंधरा लाख रुपये जळून खाक झाले होते. दोन चोरट्यांनी गॅस कटरनं एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत असताना गॅस कटरमुळं एटीएमला आग लागल्यानंतर पैसे जळून खाक झाले. त्यानंतर चोरट्यांनी एटीएममध्ये असलेला सीसीटीव्ही फोडण्याचादेखील प्रयत्न केला. तेव्हा बाजूला असलेल्या व्यक्तींना जाग आल्यानं गॅस कटर मशीन एटीएममध्ये सोडून चोरटे फरार झाले.

