मुंबई : राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम उसाच्या तुटवड्यामुळे उशिराने सुरू झाला. अपेक्षित थंडी न पडल्यामुळे साखर उतारा कमी मिळला. तरीही विविध अडचणींवर मात करून गुरुवारअखेर ७० लाख क्विंटल साखर उत्पादनाचा टप्पा पार केला आहे. हंगाम अखेरच्या टप्प्यात आला असून, मार्चच्या मध्यापर्यंत आटोपण्याची शक्यता आहे.
राज्यातील ९९ सहकारी आणि १०१ खासगी, अशा २०० कारखान्यांनी दैनंदिन ९ लाख ७० हजार टन क्षमतेने ७६३.५३ लाख टन उसाचे गाळप करून ७० लाख क्विंटल साखर उत्पादन केले आहे. साखर उतारा आणि उत्पादनात कोल्हापूर साखर विभाग आघाडीवर आहे. कोल्हापूर विभागाने सरासरी १०.९४ टक्के साखर उताऱ्याने २० लाख क्विंटल साखर उत्पादन केले आहे. त्या खालोखाल पुणे विभागाने १६ लाख क्विंटल, सोलापूर विभागाने १० लाख क्विंटल, अहिल्यानगर विभागाने ८६ हजार क्विंटल, छत्रपती संभाजीनगर विभागाने ५६ हजार क्विंटल, नांदेड विभागाने ८३ हजार क्विंटल, अमरावती विभागाने सात हजार क्विंटल आणि नागपूर विभागाने एक हजार क्विंटल साखर उत्पादन केले आहे. राज्यात सरासरी ९.२९ टक्के साखर उतारा मिळाला आहे.
३८ कारखान्यांकडून गाळप बंद
उसाचा तुटवडा असल्यामुळे ३८ कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. सोलापूर विभागात उसाचा तुटवडा जास्त जाणवत असून, २५ कारखाने बंद झाले आहेत. कोल्हापुरात चार, पुण्यात तीन, अहिल्यानगरमध्ये एक आणि नांदेडमध्ये पाच कारखाने बंद झाले आहेत. हंगाम अखेरच्या टप्प्यात असून, मार्चच्या मध्यापर्यंत हंगाम आटोपण्याची शक्यता आहे. राज्याचे एकूण साखर उत्पादन ९२ लाख क्विंटलपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.



