मुंबई : रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा वाद आता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या कोर्टात गेला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा हे या दोन्ही जिल्ह्यांतील पालकमंत्रिपदाबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाशी चर्चा करणार असून त्यानंतर याबाबतचा निर्णय जाहीर केला जाणार असल्याचे समजते.
रायगड आणि नाशिकचे पालकमंत्री पदाचा आदेश रद्द करून आता जवळपास एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. तरीही या दोन्ही जिल्ह्यांबाबतचा तिढा कायम आहे. अखेर आता हा वाद भाजपच्या दिल्लीतील श्रेष्ठींच्या दरबारात पोहोचला आहे. अमित शहा हे आता याबाबत निर्णय करणार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वासोबत चर्चा करून हा तिढा सोडविला जाणार आहे. अमित शहा हे आता याबाबत निर्णय करणार असून त्यानंतर राज्यात अधिकृत घोषणा होईल, असा दावा शिवसेनेच्या गोटातून केला जात आहे.



