महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात राजकीय गोटात हालचालींना वेग आला आहे. एकिकडे उद्धव ठाकरे गटाला गळती लागल्याचे चित्र दिसत आहे. तर पुण्यातील कसब्याचे माजी आमदार आणि काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर शिंदे गटात जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
या चर्चांवर रवींद्र धंगेकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आता यावर प्रतिक्रिय देतांना उदय सामंत म्हणाले की, रवींद्र धंगेकर यांनी भगवी मफलर आणि भगवी टोपी घालून स्टेटस ठेवले. त्यावर मी सांगितले आहे की, त्यावर जर धनुष्यबाण आला, तर आम्हाला आवडेल. त्यांना आधीच निमंत्रण दिले आहे. त्यांच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकदीने काम करायचे असेल, सामाजिक क्षेत्रात काम करायचे असेल, तर एकनाथ शिंदे यांच्याशिवाय पर्याय नाही, असे सांगत उदय सामंत यांनी पुन्हा एकदा रवींद्र धंगेकर यांना खुली ऑफर दिली.
रवींद्र धंगेकर म्हणाले की, “मी कार्यकर्त्यांसोबत बोलतो. जाताना मी लपून जाणार नाही. मला आवडलं म्हणून मी फोटो टाकलो. मी शिवसेनेत चाललो अशी परिस्थिती निर्माण झाली. उदय सामंत माझे मित्र आहेत. अजितदादा यांच्यासोबतही चांगले संबंध आहेत. आपला जन्म भगव्या उपरण्यातच झाला आहे. मी हिंदू धर्मात जन्मलो आहे. आपला मित्र आपल्यासोबत असावा, असे अनेकांना वाटतं. ऑफर देण्यात काहीही चूक नाही. मी आज कार्यकर्त्यांशी बोलणार आहे. दोन दिवसांमध्ये निर्णय जाहीर करेल, असे सूचक विधान माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केले आहे.




