पुणे : महाराष्ट्रातील उद्याोगांना जागतिक पातळीवर व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’च्या (एमसीसीआयए) वतीने ‘पुणे इंटरनॅशनल बिझनेस समिट’चे आयोजन सोमवारी (दि.२४) व मंगळवारी (दि.२५) फेब्रुवारीला करण्यात आले आहे. या निमित्ताने विविध देशांतील वाणिज्य दूत पुण्यात येणार असून, येथील कंपन्यांशी व्यावसायिक भागीदारी वाढविण्याबाबत चर्चा करणार आहेत.
याबाबत ‘एमसीसीआयए’चे महासंचालक प्रशांत गिरबने म्हणाले, की ‘एमसीसीआयए’च्या वतीने ही सहावी ‘पुणे इंटरनॅशनल बिझनेस समिट’ होत आहे. ही परिषद सेनापती बापट रस्त्यावरील हॉटेल जेडब्ल्यू मॅरियटमध्ये सोमवारी आणि मंगळवारी होईल. उद्घाटनाच्या सत्रात सोमवारी सकाळी १० वाजता नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम आणि ‘बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप’चे भारतातील अध्यक्ष डॉ. जन्मेजय सिन्हा उपस्थित असतील. या परिषदेत ‘केपीआयटी टेक्नॉलॉजीज लिमिडेट’चे अध्यक्ष रवी पंडित, मित्रचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, महाराष्ट्र औद्याोगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारसू यांच्याशी संवाद साधण्यात येणार आहे.
राज्यातील कंपन्यांची परदेशातील कंपन्यांसोबत व्यावसायिक भागीदारी वाढविण्यावर या परिषदेत भर देण्यात येणार आहे. लघु आणि मध्यम उद्याोगांसाठी जागतिक बाजारपेठांचा शोध घेतला जाणार आहे. अमेरिकेसह युरोप आणि आसियानमधील १३ देशांचे वाणिज्यदूत या परिषदेत सहभागी होणार आहेत. पुण्यासह राज्याच्या इतर भागांतील निर्यातदारांसोबत भागीदारी करण्यास इच्छुक असलेले ५० परदेशी व्यवसाय प्रतिनिधीही परिषदेला हजेरी लावणार आहेत. ते राज्यातील निर्यातदारांशी चर्चा करतील, असे गिरबने यांनी सांगितले.




