
नवी दिल्ली : शौचालयात बसून दीर्घकाळ मोबाइल फोन वापरल्याने मूळव्याध आणि गुदद्वाराच्या फिस्टुलामध्ये वाढ होत असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. बैठी जीवनशैली आणि निकृष्ट आहार या सवयींमुळे गुदाशयाच्या भागावर ताण पडतो, यामुळेही त्रास होऊ शकतो, असे ते म्हणाले.
शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. रवी रंजन म्हणाले की, एका वर्षात मूळव्याध आणि फिस्टुलाच्या ५०० हून अधिक प्रकरणांची नोंद झाली आहे. ज्यामध्ये कमी पाणी पिणे, जंक फूडचे जास्त सेवन आणि टॉयलेटमध्ये जास्त वेळ घालवणे यासारख्या जीवनशैलीची सवय असणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
मरेंगो एशिया हॉस्पिटलचे सर्जन डॉ. बिरबल म्हणाले की, अयोग्य आहारामुळे दीर्घकालीन बद्धकोष्ठता आणि शौचालयात बराच वेळ घालवल्याने एक दुष्टचक्र निर्माण होते. त्याचबरोबर फोन वापरण्याची सवय असल्यास वेळेचे भान राहत नाही. यामुळे गुदाशय क्षेत्रावर अवाजवी ताण पडतो, ज्यामुळे वेदनादायक जळजळ होते आणि मूळव्याध किंवा गुदद्वारासंबंधीचा फिस्टुला होऊ शकतो.
याचा त्रास कमी करण्यासाठी हलका, सकस आहार, नियमित व्यायाम, शरीराची हालचाल आवश्यक आहे. त्याचप्रमाणे शौचालयात मोबाइल नेणे टाळावे, ज्यामुळे शौचालयातील अधिक वेळ टाळता येईल. त्रासदायक लक्षणे आढळल्यास मात्र त्वरित वैद्याकीय सल्ला घेणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.



