
मुंबई: वाहनांच्या उच्चसुरक्षा नोंदणीकृत पाट्यांसाठी सरकारकडून भरमसाट शुल्क आकारले जात आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील दर अधिक असून ते कमी करण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही यासंदर्भात आवाज उठवला.
१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांसाठी उच्चसुरक्षा नोंदणीकृत पाट्या (एचएसआरपी) बंधनकारक केले आहे. मात्र महाराष्ट्र सरकारने आकारलेले शुल्क इतर राज्यांतील शुल्काच्या तुलनेत दुप्पट, तिप्पट आहे.
राज्य सरकारने उच्च सुरक्षा क्रमांक पाटीसाठी खासगी कंपन्यांना सहाशे कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे. मात्र, या कंपन्या क्रमांक पाटीसाठी अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील वाहनधारकांकडून तिप्पट रक्कम वसूल करत आहेत. गुजरात, गोवा, आंध्र प्रदेश, राजस्थान, केरळ या राज्यांमध्येही याच कंपन्यांना क्रमांक पाटीचे काम मिळाले आहे. पण त्या राज्यांमध्ये महाराष्ट्रापेक्षा कमी दर आहेत याकडे आमदार जयंत पाटील यांनी लक्ष वेधले.



