पुणे : पुणे-सातारा रस्त्यावरील एका सोसायटीच्या परिसरातून दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी हिरे व्यापाऱ्याचे अपहरण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. आर्थिक वादातून अपहरण झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. व्यापाऱ्याच्या पत्नीने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरे व्यापारी आणि त्यांची पत्नी मुलीला शाळेत आणण्यासाठी सॅलिसबरी पार्क परिसरात सोमवारी (४ मार्च) गेले होते. मोटारीतून ते सोसायटीत आले. त्यानंतर लष्कर भागात कामानिमित्त जाणार असल्याचे सांगून ते दुचाकीवरून गेले. सायंकाळी सहाच्या सुमारास व्यापाऱ्याच्या पत्नीच्या मोबाइलवर अनोळखी क्रमांकावरून फोन आला. ‘मैने आपके पती को उठाया है, दो करोड तयार रखो, आपके ससूरजी को बोलो, दो घंटेमें फोन करेंगे’ अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर व्यापाऱ्याच्या पत्नीने घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपहरण प्रकरणाचा तपास सर्व शक्यता गृहित धरून करण्यात येत आहे. खंडणीसाठी अपहरण करण्यात आल्याची माहिती चौकशीत मिळाली आहे. व्यापाऱ्याची सुखरूप सुटका करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहे.
– मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त



