काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर शिंदे गटात जाणार अशी चर्चा रंगली होती. मात्र, चर्चेला बगल देत धंगेकर नेहमी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे सांगत होते. दरम्यान, काँग्रेसच्या या माजी आमदाराने शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे. त्यांच्या या माहितीनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. धंगेकर शिंदे गटात जाण्यामागचं नेमकं कारण काय? काँग्रेसच्या गोटात असं काय घडलं? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कडून सात विधानसभा मतदारसंघांमध्ये निरीक्षकाच्या नियुक्ती नुकतीच करण्यात आले आहेत. यामध्ये माजी आमदारांसह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना प्रत्येक मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र या नियुक्त्यांमध्ये कुठेतरी रवींद्र धंगेकर यांना डावल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरु होती.
भगवा गमछा परिधान करत सूचित इशारा
त्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी स्वकीयांना डिवचणारं स्टेट्स ठेवले होते. ज्यामध्ये गळ्यात भगवा गमछा परिधान केलेला फोटो वापरून त्याला ‘तेरे क़दमों के तले मिट्टी भी सोना बन गयी, जर हुआ दुश्मन जहाँ शमशीर तेरी तन गयी,तू वाली है तू महेरमन है निगहमान है तू ही’, हे गाणं स्टेट्स ठेऊन रवींद्र धंगेकर यांनी स्वकियांना सूचित इशारा दिला होता.
रवींद्र धंगेकर यांचा पक्षप्रवेश करून घेण्यासाठी मंत्री उदय सामंत यांच मोठा हात आहे. काही दिवसांपूर्वी मंत्री उदय सामंत यांनी रवींद्र धंगेकर यांच्या मुलाचा वाढदिवस देखील साजरा केला होता. त्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी देखील आपण कार्यकर्त्यांची चर्चा करून मग पक्षप्रवेशाबाबत काय तो निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. असं असलं तरी ते सातत्याने आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं सांगत होते.
तसेच, यावेळी त्यांनी पक्षात कार्यकर्त्यांचे खच्चीकरण झाल्याची कबुलीदेखील त्यांनी माध्यमांना दिली होती.
पराभवानंतर धंगेकरांवर अनेक आरोप
पराभवानंतर धंगेकर यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. काँग्रेसच्या विचारधारा मानत नसल्याच्या तक्रारी त्यांच्याविरोधात करण्यात येत होत्या. कधी धंगेकर शिवसैनिकाच्या भूमिकेत दिसतात तर कधी मनसेच्या खळ्ळखट्याकच्या भूमिकेत दिसतात, अशी तक्रारही काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी सातत्याने करत होते.




