
पुणे : वाच्या ऊरुसामध्ये सुरु असलेल्या तमाशांमध्ये नाचत असल्याच्या रागातून पाच जणांनी दोघा तरुणाच्या डोक्यात वीटेने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला़ यात तिसरा तरुण किरकोळ जखमी झाला आहे.
योगश शेडगे आणि अभिजित कोंढाळकर (वय २५, रा. वडगाव पठार) असे गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. साहिल वशिवले हा किरकोळ जखमी झाला आहे. याप्रकरणी अभिजित कोंढाळकर यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी पाच जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकवासला पाणलोट क्षेत्रातील एनडीए बाजूच्या डोंगरालगत जांभळी हे गाव आहे. या गावाचा ऊरुस असल्याने गावातील नातेवाईक व परिसरातील लोक गावात आले होते. ऊरुसानिमित्त तमाशा ठेवण्यात आला होता. हा तमाशा पहाटे सव्वातीनपर्यंत सुरु होता. तमाशामध्ये अभिजित कोंढाळकर यांचा मावस भाऊ योगेश शेडगे हा नाचत असल्याने त्याचा राग मनात धरुन पाच जणांनी अभिजित कोंढाळकर, योगश शेडगे आणि साहिल वशिवले यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अभिजित आणि योगेश यांच्या डोक्यात वीटने मारहाण करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. दोघांवरही खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. पोलिसांनी पाच जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम तपास करीत आहेत.
