पुणे : बीबीए, बीबीएम, एमबीए (इंटिग्रेटेड), बीसीए, एमसीए (इंटिग्रेटेड) या अभ्यासक्रमांचे तात्पुरते शुल्क २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी २०२३-२४ वर्षासाठी जेवढे प्रमाणित केले होते, तेवढेच असेल.
तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी याबाबतच्या सूचना परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध केल्या आहेत. हे अभ्यासक्रम चालविणाऱ्या संस्था आहे त्या स्थितीत ‘एआयसीटीई’च्या अधिपत्याखाली गेल्या. मात्र, प्रशासकीय कारणास्तव या अभ्यासक्रमांना व्यावसायिक अभ्यासक्रमाचा दर्जा विलंबाने देण्यात आला.
‘या अभ्यासक्रमांचा समावेश शैक्षणिक वर्ष २०२४-२५पासून राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना व पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे या शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे,’ असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
या अभ्यासक्रमांचे शुल्क हे नंतर शुल्क नियामक प्राधिकरणाकडून निश्चित करायचे आहे. पूर्वी हे अभ्यासक्रम विद्यापीठांच्या अंतर्गत येत असल्याने संबंधित विद्यापीठाने निश्चित केलेले शुल्क आकारले जायचे. त्यामुळे सध्या तात्पुरते शुल्क म्हणून २०२३-२४ मध्ये आकारलेल्या शुल्काचा आधार घेतला गेला आहे.
दरम्यान, विविध शिष्यवृत्ती योजनांसाठी मंजूर शुल्काची प्रत संकेतस्थळावर सादर करून महाडीबीटी प्रणालीवर शुल्क पडताळणी झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज पुढील तपासणीसाठी अंतिम दिनांकापूर्वी पाठवावेत. कोणताही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये याबाबतची दक्षता घेण्यात यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.