
मुंबई : राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून मानखुर्दमधील ६५ गरीब महिलांच्या नावावर २० लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी मानखुर्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
राज्य सरकारने गतवर्षी लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. या योजनेनुसार महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येत आहेत. मात्र कागदपत्रांमधील त्रुटींमुळे काही महिलांना या योजनेचा लाभ मिळत नव्हता. त्याचाच फायदा घेत या कागदपत्रांच्या आधारे फसवणूक करण्यात आली.
मोबाइलसह नुसतेच छायाचित्र
खासगी वित्तसंस्थांकडून कर्ज देऊन कंपनीमार्फत महागडे आयफोन खरेदी केले. यासाठी संबंधित महिलांना कुर्ला आणि अंधेरी येथील दुकानात नेऊन मोबाइलसह त्यांची छायाचित्रे काढण्यात आली. त्यानंतर त्यांच्याकडून हे मोबाइल काढून घेण्यात आले. यासाठी महिलांना २ ते ५ हजार रुपये देण्यात आले. लाडकी बहीण योजनेचा हा पहिला हप्ता असल्याचे त्यांना सांगण्यात आले. तसेच पुढील हप्ता बँक खात्यात जमा होईल, असेही त्यांनी सांगितले. मात्र कर्ज घेतल्याची कल्पना या महिलांना नव्हती.
या महिला अनेक महिन्यांपासून हप्ता भरत नसल्याची बाब कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या लक्षात आली. त्याने मानखुर्द परिसरात जाऊन या महिलांची भेट घेतली. त्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. आरोपींमध्ये या परिसरातील एका महिलेसह चार ते पाच जणांचा समावेश असून या प्रकरणात वित्त कंपनीतील दोन कर्मचारी सहभागी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.



