
पुणे : ‘नॅशनल सायबर क्राइम पोर्टल’वर वेगवेगळ्या राज्यांत २९ सायबर गुन्हे दाखल असलेल्या टोळीला पुणे पोलिसांनी गजाआड केले. या टोळीने फसवणुकीसाठी १०० ते १५० बँक खात्यांचा वापर केला असून, या टोळीचे दुबई, पश्चिम बंगाल आणि गुजरातमधील काही जणांशी संबंध असल्याची माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे.
गोविंद संजय सूर्यवंशी (वय २२, रा. वाघोली, नगर रस्ता, मूळ रा. हिंगोली), रोहित सुशील कंबोज (वय २३, रा. वाघोली, नगर रस्ता, मूळ रा. पंजाब), बाबाराव ऊर्फ ओंकार भवर (वय २२, रा. वाघोली, नगर रस्ता, मूळ रा. हिंगोली), जब्बरसिंह अर्जुनसिंह पुरोहित (वय ४५, रा. चऱ्होली, मूळ रा. धारावी, मुंबई), निखिल ऊर्फ किशोर जगन्नाथ सावंत (वय ३२, रा. वाघोली, नगर रस्ता), केतन उमेश भिवरे (वय २७, रा. खराडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. न्यायालयाने आरोपींना १२ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने अनन्या गुप्ता असे नाव सांगणाऱ्या महिलेने एका ज्येष्ठाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला होता. गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाकडून वेळोवेळी एक लाख ६० हजार रुपये घेतले. ज्येष्ठाने आरोपींच्या बँक खात्यात पैसे जमा केले होते. त्यापैकी काही रक्कम वाघोलीतील एका बँक खात्यात जमा झाल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर संबंधित बँकेतील खातेधारक भिवरे याला ताब्यात घेतले. तांत्रिक तपासात इतर आरोपींची नावे निष्पन्न झाली. सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक आयुक्त मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, उपनिरीक्षक संदीप कदम, मेमाणे, हवालदार चव्हाण, संदीप पवार, दिनेश मरकडे, यादव, नागटिळक, सचिन शिंदे, जमदाडे, सोनुने यांनी ही कामगिरी केली.




