
वृत्तसंस्था, वॉशिंग्टन
चीन आणि अमेरिकेदरम्यान व्यापारयुद्ध भडकले असतानाच, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर १०४ टक्के आयातशुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला. हे शुल्क बुधवारपासून (९ एप्रिल) लागू होणार आहे. अमेरिकेच्या या निर्णयानंतर या दोन्ही आर्थिक महासत्तांदरम्यानचे व्यापारयुद्ध वाढण्याची भीती आहे.
अमेरिकेने यापूर्वी चीनवर लादलेल्या आयातशुल्काला उत्तर देताना चीनने अमेरिकेवर ३४ टक्के आयातशुल्क लागू केले होते. त्यानंतर अमेरिकेने चीनला ५० टक्के आयातशुल्काची धमकी दिली होती. त्याला उत्तर देताना, ‘‘आपले हितसंबंध राखण्यासाठी या युद्धात अखेरपर्यंत लढा देऊ,’’ असे चीनने मंगळवारी जाहीर केले. त्यानंतर काही तासांमध्येच अमेरिकेने १०४ टक्के शुल्काची घोषणा केली. दरम्यान, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांच्याशी चर्चा केली आणि द्विपक्षीय व्यापार कराराच्या वाटाघाटी लवकर पूर्ण करण्याची विनंती केली. या व्यापार करारामुळे अमेरिकेने भारतावर लादलेल्या २६ टक्के आयातशुल्कातून सवलत मिळेल अशी आशा आहे. वाणिज्यमंत्री पीयूष गोयल बुधवारी निर्यातदारांशी चर्चा करून आयातशुल्कामुळे अर्थव्यवस्थेवर किती परिणाम होऊ शकतो याचा अंदाज घेणार आहेत.




