पीटीआय, नवी दिल्ली
नॅशनल हेराल्ड प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर मंगळवारी आरोपपत्र दाखल केले. आरोपपत्रात काँग्रेस नेते सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे यांचाही आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे.
विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी ९ एप्रिल रोजी दाखल केलेल्या आरोपपत्राची ईडीने दखल घेतली आणि पुढील सुनावणी २५ एप्रिल रोजी होणार आहे. सध्याच्या अभियोक्ता तक्रारीवर २५ एप्रिल रोजी न्यायालयासमोर आरोपपत्राच्या दखल घेण्याच्या पैलूवर विचार केला जाईल. ईडी आणि चौकशी अधिकाऱ्यांचे विशेष वकील न्यायालयाच्या निरीक्षणासाठी ‘केस डायरी’ सादर करतील, असे न्यायाधीशांनी सांगितले. ईडीने आरोपपत्रात ‘पीएमएलए’च्या कलम ४ अंतर्गत आरोपींना शिक्षा देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
सुडाचे राजकारण : काँग्रेस
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरुद्ध दाखल केलेले ईडीचे आरोपपत्र हे सुडाचे राजकारण असल्याचा आरोप काँग्रेसने केला. या प्रकरणात मालमत्ता जप्त करणे हा कायद्याच्या नावाखाली केंद्र पुरस्कृत गुन्हा आहे, अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली. काँग्रेस नेत्यांवर आरोपपत्र दाखल करणे हे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी पूर्णपणे बेफिकीरपणे केलेले राजकारण आहे. मात्र काँग्रेस आणि त्यांचे नेतृत्व गप्प राहणार नाही आणि सत्याचा विजय होईल, असे रमेश म्हणाले.
भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल
नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यावर आरोपपत्र दाखल केल्यानंतर भाजपने मंगळवारी काँग्रेसवर हल्लाबोल केला. गैरव्यवहार, भ्रष्टाचार आणि सार्वजनिक मालमत्तेची लूटमार करणाऱ्यांना आता परतफेड करावी लागेल, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी केला. ईडीच्या कारवाईला सुडाचे राजकारण म्हटल्याबद्दल पूनावाला यांनी काँग्रेसवर शरसंधान सोडले आणि या प्रकरणातील कार्यवाही न्यायालयाच्या आदेशावरून सुरू झाली असे निदर्शनास आणून दिले. याचा अर्थ न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध सुडाची कारवाई केली आहे का? असे ते म्हणाले.
प्रकरण काय?
असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) ही नॅशनल हेराल्ड न्यूज प्लॅटफॉर्मची (वृत्तपत्र आणि वेब पोर्टल) प्रकाशक कंपनी आहे. २००८ मध्ये आर्थिक अडचणींमुळे नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राचे प्रकाशन थांबवण्यात आले. २०१६ मध्ये नॅशनल हेराल्ड डिजिटल स्वरूपात सुरू करण्यात आले. या कालावधीत एजीएलकडील मालमत्ता सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी स्थापन केलेल्या यंग इंडियन लिमिडेट या खासगी कंपनीकडे वळवण्यात आल्या. या मालमत्तांची किंमत जवळपास २००० कोटी रुपये आहे. मात्र या मालमत्ता केवळ ५० लाख रुपयांमध्ये खरेदी करण्यात आल्याचा आरोप आहे. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी याबाबत पटियाला न्यायालयात याचिका दाखल करून हा आरोप केला. काँग्रेस नेते सोनिया आणि राहुल हे ‘यंग इंडियन’चे प्रमुख भागधारक आहेत आणि त्यांच्याकडे प्रत्येकी ३८ टक्के भागीदारी आहे. याप्रकरणी सोनिया व राहुल यांच्यावर २०१४ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.




