
पुणे : कोथरूड भागात राहणाऱ्या एका उद्याोजकाची बिहारमध्ये हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. झारखंडमधील एका खाणीचे खोदकाम करण्यासाठी १०० कोटी रुपयांची उपकरणे हवी असल्याची बतावणी करून आरोपींनी त्यांना बिहारमध्ये बोलावून घेतले. याप्रकरणी पाटणा पोलिसांनी आरोपींना अटक केली.
लक्ष्मण साधू शिंदे (वय ५५, रा. डीपी रस्ता, कोथरूड) असे हत्या झालेल्या उद्याोजकाचे नाव आहे. शिंदे हे रत्नदीप कास्टिंग या उद्याोगाचे संचालक होते. ‘झारखंडमधील एका खाणीचे खोदकाम करण्यासाठी उपकरणे हवी आहेत. १०० कोटी रुपयांची ऑर्डर आहे,’ अशी बतावणी आरोपींनी केली होती. ‘बिहारमधील पाटणा शहरात बैठकीसाठी भेटू,’ असे आरोपींनी त्यांना सांगितले होते. शिंदे ११ मार्च रोजी विमानाने पाटणा येथे पोहोचले. त्या वेळी शिंदे यांनी कुटुंबीयांना, ‘कामानिमित्त पाटण्यातून झारखंडला चाललो आहे,’ असे सांगितले होते.
त्यानंतर शिंदे यांच्याशी कुटुंबीयांचा संपर्क झाला नव्हता. शिंदे बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. कोथरूड पोलिसांनी बेपत्ता शिंदे यांचा शोध घेतला. पाटणा, गया परिसरात पोलिसांचे पथकही गेले.
दरम्यान, आरोपींनी त्यांची हत्या केल्यानंतर मोबाइलमधून ऑनलाइन पद्धतीने रक्कम काढून घेतली आणि त्यांच्या मोबाइलमधील सर्व माहिती नष्ट केली. त्यांचा मृतदेह बिहारमधील जेहानाबाद परिसरात सोमवारी (ता. १४) सापडला. शिंदे यांची १२ एप्रिल रोजी हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पाटणा पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, हत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नसल्याची माहिती कोथरूड पोलिसांनी दिली.




