पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) २६ ते २८ एप्रिलदरम्यान होणारी राज्य सेवा मुख्य परीक्षा महिनाभर लांबणीवर टाकण्यात आली आहे. आता ही परीक्षा २७ ते २९ मे या कालावधीत होणार आहे. ही परीक्षा पुढे ढकलण्यासाठी स्पर्धा परीक्षार्थ्यांनी पुण्यात आंदोलन केले होते.
एसईबीसी आणि ईडब्यूयूएस आरक्षणाच्या गोंधळामुळे एमपीएससीने ३१८ विद्यार्थ्यांचा सुधारित निकाल जाहीर केला होता. या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेच्या अभ्यासासाठी अधिक वेळ मिळावा म्हणून विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन केले होते. त्याची दखल घेत ही परीक्षा पुढे ढकलली. या पार्श्वभूमीवर २६ ते २८ एप्रिल २०२५ या कालावधीत नियोजित मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याबाबत उमेदवारांकडून आयोगास निवेदने प्राप्त झाली. उमेदवारांची निवेदने, अन्य बाबींचा विचार करून राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ आता २७, २८, २९ मे या कालावधीत घेण्यात येईल.
आरक्षणाच्या अनुषंगाने उद्भवलेल्या असाधारण परिस्थितीचा विचार करून परीक्षेच्या वेळापत्रकातील बदल हा एकवेळची अपवादात्मक बाब म्हणून आयोगाने निर्णय घेतला आहे, असे एमपीएससीच्या सचिवांनी प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.



