पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून, सध्या भारतात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुणे शहरात सध्या अशा 111 पाकिस्तानी नागरिकांचे वास्तव्य असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पुण्यात पाकिस्तानी नागरिकांची नोंद-
मंगळवारी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात गोळीबारात 26 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने अटारी-वाघा सीमावरील तपासणी केंद्र तातडीने बंद केले आहे. या मार्गे आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना तत्काळ मायदेशी परतण्यास सांगण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे (Pune News) शहरात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची माहिती घेतली असता, 111 नागरिक शहरात वास्तव्यास असल्याचे पोलिसांकडून (Pune Police) समोर आले आहे.
या नागरिकांमध्ये 91 जण (Pune News) दीर्घ मुदतीच्या व्हिसावर भारतात आलेले आहेत, तर 20 जण व्हिजिटर व्हिसावर (45 ते 90 दिवस) दाखल झालेले आहेत. बहुतेक नागरिक हे नातेवाईक भेटण्यासाठी किंवा वैद्यकीय उपचारासाठी भारतात आलेले आहेत. पुण्यातील परदेशी नागरिक नोंदणी केंद्राकडे याबाबतची नोंद झालेली आहे. त्यातील तिघांनी पुणे पोलिसांची (Pune Police) परवानगी घेऊन स्वेच्छेने देश सोडला आहे.
केंद्र सरकारच्या आदेशानंतर पोलिसांची सतर्कता-
भारतामध्ये परदेशी नागरिकांनी प्रवेश केल्यानंतर स्थानिक पोलीस ठाणे आणि पोलीस आयुक्तालयात नोंदणी करणे अनिवार्य असते. तसेच एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे गरजेचे असते. या प्रक्रियेनुसार पुणे पोलिसांनी संबंधित पाकिस्तानी नागरिकांची माहिती घेतली असून, त्यांच्या वास्तव्याबाबतची पडताळणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, परराष्ट्र मंत्रालय (Ministry of External Affairs) किंवा मुंबई परकीय नागरिक नोंदणी विभागाकडून (Mumbai FRRO) अद्याप कोणताही अधिकृत आदेश प्राप्त झालेला नसल्यामुळे पुढील कार्यवाही थांबवण्यात आली आहे. परंतु पहलगामच्या घटनेनंतर पोलिस यंत्रणा अधिक सजग झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.




