नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर तीन दिवसांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिल्याने देशभरात संतापाची लाट पसरली होती. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील भांडणात अमेरिकेच्या मध्यस्थीचं कारण काय, अमेरिकेनं दबाव टाकला का, असे प्रश्न उपस्थित झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांना संबोधित करताना, अप्रत्यक्षपणे अमेरिकेलाही (America) ठणकावलं आहे. पाकिस्तानच्या बाबतीत अणवस्त्र दबाव चालणार नाही, असे मोदींनी स्पष्ट केले. त्यानंतर, आज परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने पत्रकार परिषद घेत पुन्हा तीच री ओढण्यात आली आहे. काश्मिरच्या मुद्द्यावर आम्हाला कोणाचीही मध्यस्थी चालणार नाही, असे म्हणत परराष्ट्र खात्याने पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना स्पष्ट शब्दात सांगितलं आहे. पीओकेवर भारताची भूमिका स्पष्ट आहे, पाकिस्तानला पीओके खाली करावचं लागेल. तर, जम्मू काश्मीर हा फक्त भारत आणि पाकिस्तान दोन राष्ट्रांचा प्रश्न आहे, असे परराष्ट्र प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटले.
परराष्ट्र खात्याच्यावतीने आज प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषद घेऊन भारताची भूमिका मांडली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ संघटनेनं स्वीकारला आहे. त्यामुळे, टीआरएफ संघटनेला दहशतवादी संघटनेच्या यादीत टाकावे, अशी मागणीने भारताने केली. पाकिस्तान अनेक वर्षांपासून दहशतवादाला खतपाणी घालत आहे. भारताने इशारा देऊनही पाकिस्तानने ऐकलं नाही, पाकिस्तानकडून हल्ला झाल्यास भारतही प्रत्युत्तर देणार, असे परराष्ट्र मंत्रालयाचे ठणकावून सांगितले. तसेच, पाकिस्तानने अवैधपणे ताबा मिळवलेला काश्मीर (POK) खाली करावा लागेल, गेल्या अनेक वर्षांपासून भारताची हीच नीती असून ती कायम आहे, असेही जायस्वाल यांनी स्पष्ट केले.
7 मे रोजी भारताने केलेल्या एअर स्ट्राईकपासून ते 10 मे रोजी शस्त्रसंधीची घोषणा होईपर्यंत भारत आणि अमेरिका यांच्यात युद्धजन्य परिस्थितीवर चर्चा झाली. मात्र, या चर्चेत कुठेही व्यापाराचा मुद्दा आला नाही, अशी माहितीही रणधीर जयस्वाल यांनी दिली. त्यामुळे, डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेऊन दिलेल्या माहितीला भारताच्या परराष्ट्र खात्याने खोडून काढलं आहे. आता, यावर अमेरिकेडून काय प्रतिक्रिया येते हे पाहावे लागेल.