राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे. पदाधिकाऱ्यांच्या या बैठकीत शरद पवार कोणत्या विषयावर चर्चा करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण त्याआधीच शरद पवारांच्या गटातील एक गट अजित पवारांच्या गटात जाण्यास इच्छूक असल्याची चर्चा आहे. त्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्या देखील नावाची चर्चा सुरु आहे. मात्र या चर्चांवर खुद्द एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
काय म्हणाले एकनाथ खडसे ?
“ज्यावेळेस अजित पवार यांचा गट वेगळा झाला, त्याच वेळी ज्यांना जायचे होते ते सर्व आमदार अजित पवार गटात सामील झाले. त्यावेळी मला देखील अजितदादा पवार गटात येण्याचा निरोप देण्यात आला होता. परंतु, त्यावेळेस देखील मी अजित पवार गटात गेलो नाही. मी शरद पवार साहेबांसोबतच राहिलो आणि आताही पवार साहेबांसोबतच राहणार आहे. आज तरी असा कुठलाही गट अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता नाही. अजित पवार गटात जाणार या केवळ चर्चा आहे आणि चर्चांना काही अर्थ नाही,” असे एकनाथ खडे यांनी स्पष्ट केले.
एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, “शरद पवार साहेब जो निर्णय घेतील त्यानुसार माझाही निर्णय असेल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी या सर्व चर्चांकडे लक्ष न देता, पक्ष विस्तार कसा होईल यावर भर द्यावा. पवार साहेबांचे निर्देशच आपल्यासाठी अंतिम असेल.” यानुसार एकनाथ खडसे यांनी अजित पवार यांच्या गटात जाणार नसून शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठ आहोत, असे स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून खडसे अजित पवार यांच्या गटात जाणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.



