वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरण ताजे असतानाच पुण्यात आणखी एका विवाहतेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळं पुणे पुन्हा एकदा हादरले आहे.
ही घटना हडपसर येथील आहे. देवकी प्रसाद पुजारी उर्फ दीपा असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. याप्रकरणी महिलेच्या वडिलांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली असून सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. वैष्णवी हगवणे प्रकरण ताजं असतानाच पुण्याच्या हडपसरमधील आणखी एक अशीच घटना समोर आल्याने शहरात खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आपलं जीवन संपवले. मनासारखा हुंडा, मानपान न दिल्याच्या कारणावरुन सुनेचा सासरच्या लोकांकडून छळ करण्यात येत होता. याप्रकरणी, पतीसह सासू, सासरे, दीर यांच्यावर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 एप्रिल रोजी विजयपूर येथील बागेवाडीतील बसव मंगल कार्यालयात दीपा व प्रसाद यांचा विवाह झाला. लग्न सोहळ्यात दीपाच्या घरच्यांनी हुंडा म्हणून प्रसादला 4 तोळे सोने दिले, यासह मानपानाप्रमाणे 10 लाख रुपये खर्च करुन लग्न करुन दिले. मात्र, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी दीपा पुण्यात आली. त्याच दिवसापासून प्रसाद व त्याची आई सुरेखाने लग्नात भांडी, फ्रीज दिले नाहीत, यासह मानपान केला नाही म्हणून वाद घालून तिला शिवीगाळ केली. दीपाने तिच्या वडिलांना ही हकीगत सांगून माहेर गाठलं. परंतु, त्यानंतर दीपाच्या सासऱ्याने तिची समजूत घातली आणि तिला पुन्हा पुण्यात आणलं. 18 मे रोजी दीपाने वडिलांना फोन केला व ती रडू लागली आणि लग्नात भांडी सामान दिले नाही म्हणून प्रसाद, दीर, सासू आणि सासरे शिवीगाळ करुन मारहाण करत असल्याचे वडिलांना सांगितले. त्यानंतर, दीपाच्या वडिलांनी मी पुण्यात येतो व वाद सोडवितो, असे सांगून तिची तात्पुरती समजूत काढली. पण, 19 मे रोजी दीपा हिने हडपसर मध्ये वास्तव्यास असलेल्या आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.