
बारामती – “ज्ञानोबा माऊली तुकाराम… ज्ञानोबा माऊली तुकाराम…” च्या गजराने आणि भक्तिभावाने भारलेल्या वातावरणात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आज बारामती शहरात भव्य स्वागत करण्यात आले. पाटस रोडवरील देशमुख चौकात बारामती तालुका आणि शहर प्रशासनाच्यावतीने पालखी रथ आणि दिंड्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले.
या स्वागतप्रसंगी खासदार सुनेत्रा पवार, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वारकऱ्यांसाठी सुसज्ज सुविधा – आषाढी वारीसाठी येणाऱ्या लाखो वारकऱ्यांची सोय लक्षात घेता बारामती नगरपरिषद आणि प्रशासनाकडून विविध सोयी-सुविधांची पूर्वतयारी करण्यात आली आहे. शारदा प्रांगण आणि नगरपरिषद कार्यालय परिसरात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पालखी मार्गावरील रस्त्यांची विशेष स्वच्छता मोहीम राबवली गेली असून, शहरातील विविध ठिकाणी फिरते शौचालयही उभारण्यात आले आहेत.
पावसामुळे रोगराई पसरू नये म्हणून मुक्कामस्थळी निर्जंतुकीकरण आणि शहरभर डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धूर फवारणीही करण्यात आली आहे. यासोबतच सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस मदत केंद्र, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, सूचना फलक यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. ध्वनीक्षेपकाद्वारे वारकऱ्यांना महत्त्वाच्या सूचना सातत्याने दिल्या जात आहेत.
‘हरित वारी – सुरक्षित वारी’ उपक्रम – बारामती शहरात पर्यावरणपूरक वारीचा संदेश देण्यासाठी ‘हरित वारी – सुरक्षित वारी’ या संकल्पनेअंतर्गत वृक्षारोपण केले जात आहे. प्लास्टिकमुक्त वारी, प्रदूषणमुक्त बारामतीसाठी विशेष जनजागृती मोहीम राबवली जात आहे. शहरात ठिकठिकाणी कचरा कुंडी आणि पुनर्वापर केंद्रे उभारली गेली आहेत.




