- ठाणे- भिवंडी-कल्याण भूमिगत मेट्रोसह नवीन उड्डाणपूल निर्मितीचा स्वतंत्र प्रकल्प राबविणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘मुंबई मेट्रो मार्ग-5’च्या कामासंदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यांनी सादरीकरण केले.
भिवंडी शहरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आणि शहराच्या सर्वांगीण व वेगवान पायाभूत विकासासाठी भूमिगत मेट्रोसह रस्ता रुंदीकरण व नवीन उड्डाणपूल निर्मितीचा स्वतंत्र प्रकल्प राबविण्याचा निर्णय ‘ठाणे-कल्याण-भिवंडी मेट्रो मार्ग क्रमांक 5’च्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.
पायाभूत सोयी-सुविधांच्या प्रकल्पांमुळे भिवंडी शहराच्या विकासाला गती मिळणार असून, या प्रकल्पांसाठी शासन निधी उपलब्ध करून देईल. भिवंडी शहरात मेट्रोच्या कामासोबतच रस्ता रुंदीकरण प्रकल्पाचे काम एकत्रितपणे सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिल्या. रस्ता रुंदीकरणामुळे भिवंडी शहरातील उत्तर भागाचा विकास होईल आणि नागरिकांचे दळणवळण गतिमान होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (MMRDA) राबविण्यात येत असलेल्या मेट्रो लाईन-5 प्रकल्पाच्या माध्यमातून ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर परिसरातील लाखो नागरिकांना जलद आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध होणार आहे. विकसनशील शहरे आणि औद्योगिक केंद्रांसाठी सार्वजनिक वाहतूक आणि रस्ते ही दोन्ही माध्यमे परस्परपूरक असून, त्यांची अंमलबजावणी समांतर पद्धतीने केल्यास विकासाची गती वाढेल आणि नागरिकांना अधिक फायदेशीर सेवा मिळू शकणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
या मेट्रो प्रकल्पाचा विस्तार आता कल्याणच्या पुढे उल्हासनगरपर्यंत होत आहे. उल्हासनगरच्या पुढे अंबरनाथजवळील चिखलोली उपनगरीय रेल्वे स्थानकापर्यंत विस्तार करण्याबाबत अभ्यास करण्यात येत आहे. यामुळे अंबरनाथ, उल्हासनगर, शहाड आणि आजूबाजूच्या परिसरातील लाखो रहिवाशांचा मुंबई आणि ठाणे या प्रमुख शहरी केंद्रांपर्यंतचा प्रवास अधिक जलद होणार आहे.
मुंबई महानगर प्रदेशातील भिवंडी हे मालवाहतूकीचे विकास केंद्र होत आहे. या शहराच्या विकासासाठी शासन कटीबद्ध आहे. शहरातील पायाभूत सोयी-सुविधांचा विकास करण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. शहरातील मेट्रो मार्गाच्या कामाबाबत आलेल्या लोकप्रतिनिधींच्या सूचनांचाही अंतर्भाव करण्यात यावा, अशा सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. मेट्रोचे काम करताना ‘डिप टनेल’ तंत्रज्ञान वापरून बोगदा तयार करण्याच्या कामाची पडताळणी करावी, तसेच दुहेरी बोगदा तंत्रज्ञान वापरून रस्ता व मेट्रो मार्ग तयार करण्याच्या कामाचाही अभ्यास करावा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
‘ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्ग क्रमांक 5’ची ठळक वैशिष्ट्ये:
✅ लांबी: एकूण 34.23 किमी. यात मेट्रो मार्ग 5 टप्पा 1 (11.90 किमी), मेट्रो मार्ग 5 टप्पा 2 (10.5 किमी) आणि मेट्रो मार्ग 5अ (11.83 किमी) यांचा समावेश आहे.
✅ स्थानके: 19 स्थानके (1 भूमिगत व उर्वरित उन्नत)
✅ ट्रेनची रचना: 6 डब्यांची ट्रेन
✅ प्रस्तावित डेपो: काशेळी येथे (26.93 हेक्टर)
✅ इंटरचेंज स्थानके: कल्याण स्थानक (मेट्रो मार्ग 12 सह) आणि कापूरबावडी (मेट्रो मार्ग 4)
✅प्रकल्पाची अंदाजित किंमत: ‘मेट्रो मार्ग 5’ करिता ₹8417 कोटी तर ‘मेट्रो मार्ग 5अ’ करिता ₹4063 कोटी
या बैठकीला संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.