
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा भागातील उत्तरी वजीरिस्तान इथं आत्मघातकी हल्ला झाला आहे. या बॉम्बस्फोटात १३ हून अधिक पाकिस्तानी सैनिक ठार झाले तर २० हून अधिक जखमी झाले आहेत. मीर अली खादी मार्केटमध्ये झालेल्या या हल्ल्यात जखमींमध्ये १२ हून अधिक महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. ज्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचे बोलले जाते.
माहितीनुसार, एका कारने सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी पाकिस्तानी सैन्याच्या एका वाहनाला जोरदार टक्कर मारली. ते बॉम्ब डिस्पोजल (EOD) युनिटचे वाहन होते. सैन्याचे वाहन नागरी भागात ड्युटीवर जात होते. त्यावेळी हा आत्मघातकी हल्ला करण्यात आला. या हल्ल्याची पाकिस्तानातील दहशतवादी संघटना तहरीक ए तालिबान पाकिस्तान(TTP) चा गट उसूद उल हर्ब याने जबाबदारी घेतली आहे. या आत्मघातकी हल्ल्यात स्फोटकांनी भरलेली कार सैन्याच्या ताफ्याला धडकली त्यातून झालेल्या स्फोटात १३ सैनिक ठार झाले. १० जवान जखमी आहेत त्याशिवाय १९ सर्वसामान्य नागरिकही जखमी झाले. या स्फोटाने आसपासच्या रहिवासी घरांनाही मोठे नुकसान झाल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
दरम्यान, जागतिक दहशतवादी आकडेवारी २०२५ नुसार, पाकिस्तानात दहशतवादी हल्ल्यातील मृतांची संख्या ४५ टक्क्यांनी वाढली आहे. २०२३ साली ७४८ जणांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला होता. २०२४ साली मृतांचा आकडा १०८१ पर्यंत वाढला. त्याशिवाय पाकिस्तानात दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या जगातील दुसऱ्या क्रमांकाची आहे.