मुंबई : प्रदेश भाजपच्या अध्यक्षपदी माजी मंत्री आणि सध्याचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची निवड १ जुलै रोजी मुंबईत केली जाईल. त्यासाठी केंद्रीय भाजपने केंद्रीयमंत्री किरण रिजिजू यांची निरीक्षक म्हणून शुक्रवारी नियुक्ती केली.
प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी किरण रिजिजू हे ३० जून रोजी मुंबईत येतील आणि १ जुलै रोजी चव्हाण यांच्या नावाची घोषणा समारंभपूर्वक केली जाईल. चव्हाण हे सध्याचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची जागा घेतील. चव्हाण यांची जानेवारी २०२५ मध्ये प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी नांदेड येथे २६ मे रोजी झालेल्या भाजपच्या मेळाव्यात बोलताना ‘भाजपचे भावी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण’ असा उल्लेख केला होता.
पक्षाच्या पद्धतीनुसार प्रदेशाध्यक्ष या पदासाठी अर्ज मागविले जातील. चव्हाण यांचा एकट्याचा अर्ज येईल चव्हाण यांचा एकट्याचा अर्ज येईल आणि नंतर त्यांच्या नावाची घोषणा मुंबईत १ जुलै रोजी होईल. त्यानंतर एक महिन्यात पक्षाचे अधिवेशन होईल आणि चव्हाण यांच्या नावावर मान्यतेची मोहोर उमटेल.
राष्ट्रीय अध्यक्ष लवकरच
भाजपच्या देशातील ५० टक्क्यांहून अधिक प्रदेशाध्यक्षांची निवड झाल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांची निवड करण्याची पद्धत आहे. येत्या आठ-दहा दिवसांत आणखी काही राज्यांचे प्रदेशाध्यक्ष निवडले जातील. नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची निवड जुलैमध्ये होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बैठक ४, ५ आणि ६ जुलै रोजी दिल्लीत होणार आहे. त्यादरम्यान भाजप आणि संघ नेतृत्वात चर्चा होऊन राष्ट्रीय अध्यक्षांचे नाव ठरेल.