
दिल्ली : जून महिन्यात १२ तारखेला गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला एक भीषण अपघात झाला होता या अपघातात विमानातील प्रवासी आणि आणि कर्मचारी असे मिळून २४१, तर विमान कोसळले त्या परिसरातील इमारती आणि रस्त्यांवर असलेले ३४ जण असे मिळून सुमारे २७५ जण मृत्युमुखी पडले होते. दरम्यान, अहमदाबादमध्ये हा विमान अपघात घडल्यानंतर अवघ्या ३८ तासांमध्येच दिल्लीमध्ये एअर इंडियाचं विमान अशाच अपघातातून थोडक्यात बचावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना १४ जून रोजी सकाळी घडली.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार दिल्ली येथून व्हिएन्ना येथे जाणाऱ्या एअर इंडियाच्या १८७ या विमानाने उड्डाण करताच इशारे देण्यास सुरुवात केली होती. बोईंग ७७७ प्रकारच्या या विमानाने दिल्ली येथून उड्डाण करताच स्टॉल वॉर्निंग, ग्राऊंड प्रॉक्सिमिटी वॉर्निंग सिस्टिम ची डोंट सिंक वॉर्निंग कॉकपिटमध्ये मिळू लागली. याचाच अर्थ हे विमान उंचीवरून वेगाने खाली येऊ लागले होते.
याचदरम्यान, स्टिक शेकर अलार्मसुद्धा सक्रिय झाला. म्हणजेच कॉकपिटमधील कंट्रोल कॉलम हलू लागला. तसेच वैमानिकांना संभाव्य धोक्याची जाणीव तातडीने करून देण्यात आली. त्यानंतर वैमानिकांनी परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळवत विमानाला योग्य उंचीवर आणलं आणि प्रवास सुरू ठेवला. ही धोकादायक परिस्थिती काही मिनिटांसाठीच निर्माण झाली असली तरी वैमानिकांनी वेळीच प्रसंगावधान राखलं नसतं तर परिस्थिती धोकादायक बनून मोठी दुर्घटना घडली असती. त्यानंतर हे विमान नऊ तास आणि ८ मिनिटे प्रवास करत व्हिएन्नामध्ये सुखरूपरीत्या उतरले. तिथे काही वेळाने नवे कर्मचारी आले. त्यानंतर हे विमान टोरांटो येथे रवाना झाले.