मुंबई : परदेशातील नोकरीचे आमिष दाखवून देशभरातील अनेक तरुणांची फसवणूक करणाऱ्या यूट्युबरला गुन्हे शाखेने पकडले. आरोपीविरोधात देशभरात चार गुन्हे दाखल असून त्याचा ताबा चारकोप पोलिसांना देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीविरोधात मुंबई, मिरा-भाईंदर, उत्तर प्रदेश व हरियाणा येथे चार गुन्हे दाखल आहेत. होतकरून तरूणांना परदेशात पाठवत असल्याचे व्हिडिओ अपलोड करून त्याने अनेकांची फसवणूक केली असून पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.
संजय विश्वकर्मा (३३) असे आरोपीचे आहे. संजय त्याच्या अन्य साथीदारांसह यूट्यूबवर व्हिसा एक्स्पर्ट मॅनपाॅवर नावाने यूट्यूब चॅनेल चालवत होता. परदेशात चांगल्या पगाराच्या नोकरीसंदर्भातील संपर्कासाठी दोन क्रमांक दिले होते. त्या क्रमांकांवर गरजूंनी संपर्क साधल्यावर आरोपी संबंधितांना हेरून त्यांची फसवणूक करीत होता.



