मुंबई : तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) अभियांत्रिकी पदविका (पॅालिटेक्निक) अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना २ ते ४ जुलै या कालावधीत अर्ज सादर करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी ही अखेरची मुदतवाढ आहे.
दहावी नंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी व तंत्रज्ञान / वास्तुकला या पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांच्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया २० मे २०२५ रोजी सुरू करण्यात आली. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी प्रथम २६ जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र प्रवेश प्रक्रियेसाठी मिळणारा उत्तम प्रतिसाद पाहता, अभियांत्रिकी पदविका प्रवेश अर्ज नोंदणीसाठी ३० जून २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय तंत्रशिक्षण संचालनालयाने घेतला होता.