मुंबई: महाराष्ट्राच्या महसूल विभागातील 12 ज्येष्ठ अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) पदोन्नती मिळाली आहे. केंद्र सरकारच्या कार्मिक, लोक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) या 12 अधिकाऱ्यांना आयएएस कॅडर प्रदान केल्याने महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेत एक नवीन अध्याय जोडला गेला आहे.
राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना म्हटले, “महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेला अधिक लोकाभिमुख करण्यासाठी या अधिकाऱ्यांना नवी आणि महत्त्वपूर्ण संधी मिळाली आहे. महसूल विभाग हा महाराष्ट्राच्या प्रशासकीय यंत्रणेचा कणा आहे. या अधिकाऱ्यांनी आपली संपूर्ण क्षमता राज्याच्या विकासासाठी आणि लोककल्याणकारी योजनांना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी उपयोगात आणावी, अशी अपेक्षा आहे.” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेली ही पदोन्नती म्हणजे या अधिकाऱ्यांच्या कार्याची पावती असल्याचेही त्यांनी नमूद केले.1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत रिक्त असलेल्या जागांवर या नव्या आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती होणार आहे.
पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांची नावे:
-विजयसिंह देशमुख
-विजय भाकरे
-त्रिगुण कुलकर्णी
-गजानन पाटील
-महेश पाटील
-पंकज देवरे
-मंजिरी मनोलकर
-आशा पठाण
-राजलक्ष्मी शहा
-सोनाली मुळे
-गजेंद्र बावणे
-प्रतिभा इंगळे
महसूलमंत्री बावनकुळे यांनी ट्विटद्वारे सांगितले की, “महाराष्ट्राच्या महसूल सेवेतील अधिकाऱ्यांचे मी नेहमीच प्रोत्साहन करतो आणि त्यांच्या गुणांचे कौतुक विधिमंडळातही करतो. उद्देश एकच, लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात.” या पदोन्नतीमुळे महाराष्ट्राच्या प्रगतीला नवे बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.