पुणे : कल्याणीनगर आणि मांजरी येथील दोन दारुच्या दारुचे शटर उचकटून चोरट्यांनी रोकड व दारूच्या बाटल्या चोरल्याच्या घटना ताजी असताना महंमदवाडी येथील वाईन शॉपचे शटर उचकटून चोरट्याने रोकड व दारुच्या बाटल्या चोरुन नेल्याची घटना घडली आहे.
याबाबत हरप्रीतसिंग भुपेंद्रसिंग होरा(वय ४०, रा. एनआयबीएम रस्ता) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कल्याणीनगर येथील प्रकाश वाईन्स या दुकानातून रोकड चोरुन नेताना चोरट्याने दारुच्या बाटल्या फोडल्या होत्या. तर रेस्टॉरंट बार या मांजरीतील हॉटेलमधून चोरट्याने दारुच्या बाटल्या चोरुन नेल्या होत्या.
होरा यांचे नॅशनल वाईन शॉप हे दुकान महंमदवाडी येथील विस्ता सेंटर मध्ये आहे. चोरट्याने दुकानाचे शटरचे लॉक लॅच कटरच्या सहाय्याने तोडून २ जुलै रोजी पहाटे साडे पाच वाजता आत प्रवेश केला. दुकानातील गल्ल्यात ठेवलेली रोख रक्कम व विदेशी दारुच्या बाटल्या असा ६९ हजार ७४० रुपयांचा माल चोरुन नेला. पोलीस हवालदार काळभोर तपास करीत आहेत.