पुणे : महापालिकेच्या खेळांच्या मैदानांवर ढोल-ताशा पथकांना सरावासाठी परवानगी दिली जाणार नाही, असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केल्यानंतरही सणस मैदानाच्या परिसरात ढोल पथकांनी चक्क मैदान, पाण्याची टाकी आणि प्रवेशद्वारावरच वादनाच्या सरावासाठी शेड उभारले असल्याचा आरोप होत आहे. महापालिका आयुक्तांना याबाबत विचारले असता, महापालिकेने कोणत्याही पथकाला परवानगी दिली नाही. पाहणी करून कारवाई केली जाईल, असे सांगितले.
सध्या शहरातील विविध ठिकाणी ढोल पथकांचे सराव सुरू आहेत. नदीपात्रातील रस्त्यालगत असलेल्या मोकळ्या जागेत, घाटांसह शहर व उपनगरांसह मोकळ्या व बंदिस्त मिळकतींमध्ये सराव सुरू आहेत. गेल्या काही वर्षांपासून महापालिकेच्या सारसबागेजवळ असलेल्या सणस मैदानाचे मुख्य प्रवेशद्वार, बॉक्सिंग मैदान, कबड्डीचे मैदान आणि सणस मैदानाच्या सिंथेटिक ट्रॅकशेजारी असलेल्या पाण्याच्या टाकीवर, ढोल पथकांनी सराव सुरू केला होता.
मात्र, महापालिकेच्या परवानगीची वाट न पाहता गुरुवारी सकाळपासून सणस मैदान परिसरात ढोल पथकांनी सरावासाठी शेड टाकण्यास सुरुवात केल्याचा दावा करण्यात आला आहे. मुख्य प्रवेशद्वारासह येथील बॉक्सिंग मैदान, कबड्डीचे मैदान आणि सणस मैदानाच्या सिंथेटिक ट्रॅकच्या शेजारी असलेल्या पाण्याच्या टाकीवर शेड उभारण्याचे काम हाती घेतल्याचा आरोप आहे. याबाबत महापालिकेतील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, त्यावर बोलण्यास कुणी तयार नव्हते. मात्र, येथे कोणालाही परवानगी दिली नसल्याचे आयुक्त नवल किशोर राम यांनीच स्पष्ट केले.