सध्या लग्नसराई सुरू आहे. कामाच्या सगळ्या धावपळीत मग पार्लरमध्ये जायला वेळ मिळतच नाही. किंवा एरवीही घरातल्या, बाहेरच्या कामांच्या वेळा आणि पार्लरच्या वेळा यांचा मेळ जमत नाही आणि त्यामुळे मग पार्लरला जाणं होतच नाही. अशावेळी चेहऱ्याची योग्य काळजी घेण्यासाठी असे काही घरगुती उपाय नक्कीच फायदेशीर ठरू शकतात. म्हणूनच चेहऱ्याचं टॅनिंग कमी होऊन चेहरा उजळ, चमकदार व्हावा यासाठी घरच्याघरी नैसर्गिक पद्धतीने ब्लीच फक्त १० रुपयात कसं करायचं, याची ही सोपी पद्धत जाणून घ्या.
घरच्याघरी ब्लीच कसं करायचं?
१. यासाठी आपल्याला अर्धा बटाटा, अर्धा टोमॅटो, अर्धे लिंबू, १ टेबलस्पून तांदळाचं पीठ, १ टेबलस्पून बेसनपीठ आणि चिमुटभर हळद एवढं साहित्य लागणार आहे.
२. सगळ्यात आधी बटाट्याची साले काढून घ्या आणि त्याचे बारीक काप करून घ्या. त्याचप्रमाणे टोमॅटोही बारीक चिरून घ्या.
३. आता मिक्सरच्या भांड्यात बटाट्याचे काप, टोमॅटोचे काप आणि अर्धे लिंबू सालासकट टाका आणि त्याची बारीक पेस्ट करून घ्या.
४. ही पेस्ट गाळणीने गाळून घ्या. त्याचं जे पाणी निघेल त्यात तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ टाका.
५. त्यातच थोडी हळद टाकून सगळं मिश्रण व्यवस्थित कालवून घ्या. हा पॅक आता तुमच्या चेहऱ्यावर लावा. हलक्या हाताने २ ते ३ मिनिटे मसाज करा. त्यानंतर पॅक चेहऱ्यावर तसाच सुकू द्या.
६. त्यानंतर एका वाटीत कच्चे दूध घ्या. त्यात कापूस बुडवा आणि त्या कापसाने चेहरा चोळून चोळून स्वच्छ करा.
७. त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घ्या. अशा पद्धतीने आठवड्यातून दोन वेळा घरच्याघरी ब्लीच केल्यास चेहरा तुकतुकीत दिसेल आणि टॅनिंग निघून जाईल.




