जुन्नर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभर त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. तसेच राज्यपाल हटाव अशी मागणी जोर धरू लागली आहे.पुणे जिल्ह्यातील जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी तर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवनेरीवर पाय ठेऊ देणार नसल्याचा इशारा दिला आहे. राज्यपालांची शिवजयंतीपर्यंत हकालपट्टी केली नाही तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना शिवनेरीवर पाय ठेऊ देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांनी दिला आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली आज वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळी आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. यावेळी सुनील टिंगरे, जयदेव गायकवाड, संदीप क्षीरसागर, अशोक पवार, अमोल मिटकरी,नितीन पवार,अतुल बेनके,रुपाली पाटील व राष्ट्रवादीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते, यावेळी ते बोलत होते.
आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून वारंवार अपमान होत आहे. राज्यपाल हे या महापुरुषांची नेहमीच टिंगल टवाळकी करताना पाहायला मिळत आहेत, असं अतुल बेनके म्हणाले. हा देश वेगवेगळ्या विचारांच्या लोकांचा देश आहे. यातीलच एक विचार असा आहे की जो नेहमीच छत्रपती शिवरायांचा अपमान करत आला आहे. मात्र, राज्यपाल हे एक महत्त्वाचं पद असतं त्यांनी कुठल्याही विचाराशी प्रेरित होऊन वागायचं नसतं. महाराष्ट्राच्या अस्मितेवर राज्यपालांनी जो घाला घातला आहे. त्यामुळे राज्यपालांची त्या पदावर बसण्याची पात्रता नाही, असं अतुल बेनके म्हणाले आहेत.
दरम्यान, केंद्रातल्या आणि राज्यातल्या भाजपच्या राज्यकर्त्यांनी राज्यपालांना महाराष्ट्रातून हाकलून द्यावे. अन्यथा येत्या शिवजयंतीला जुन्नर तालुक्यातील तमाम शिवभक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना शिवनेरी किल्ल्यावर पाय ठेवू देणार नाहीत, असा थेट इशारा अतुल बेनके यांनी दिला आहे.




