पुणे, दि. 8 – व्यावसायिक वारसा मिळालेल्या तरूणांनी आई-वडिलांनी केलेल्या कष्टाची जाण ठेवली पाहिजे. त्यांनी केलेले कष्ट, त्याग, सतत डोळयासमोर ठेवून त्याच आदर्शांवर वाटचाल करा, यश तुमचेच आहे. जगात कष्टाला कुठलाही शॉर्टकट नाही. व्यवसायात अपार कष्ट करून यश मिळवा, परंतू त्याच वेळेस सामाजिक बांधिलकीचीही जाणीव ठेवा असे प्रतिपादन उद्योजक फतेचंद रांका यांनी केले.
गौतम कोतवाल लिखित “शुद्ध बीजापोटी’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळयाला रांका प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कोतवाल यांनी कर्तृत्ववान लोकांची कर्तृत्ववान मुले ही संकल्पना डोळयासमोर ठेवून “शुद्ध बीजापोटी’ हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात दुसऱ्या अथवा तिसऱ्या पिढीतील नवउद्योजकांच्या यशोगाथा दिल्या आहेत.
युवा पिढीसमोरील आव्हाने वेगळी आहेत. वाढती स्पर्धा, टेक्नॉलॉजी, डिजीटल वर्ल्ड या सर्वांमुळे पारंपारीक व्यवसायात नावीन्यता आणली तरच ते टिकतील, असे कोतवाल म्हणाले. ऍक्युरेट गेजींग कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर विक्रम साळुंके, उद्योजक दीपक कुदळे, विकास रासकर यांनी मनोगत व्यक्त केले. यशोगांथापैकी सौरभ आणि स्वप्नील अमराळे, अभिषेक बोबडे, गौरव घुले, ओंकार जाधव, गिरीश कोंढरे, सौरभ आणि सिद्धार्थ कुंजीर, अनघा पवार, डौ. गौरी आणि डॉ. सौम्या साबळे, अजितेय ताम्हाणे, निखील आणि निलांबरी तुपे यांचा सन्मान करण्यात आला.
ट्रिनिटी शिक्षण संकुलनाच्या व्यवस्थापकीय संचालिका हर्षदा जाधव यांनी आभार मानले. सूत्रसंचालन रसिका तुळजापूरकर आणि दीप्ती कुलकर्णी यांनी केले




