नवी दिल्ली : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या पतधोरण समितीची बैठक चालू असल्यामुळे इतर बाजाराप्रमाणे सोने चांदी बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. जागतिक संकेतानुसार भारतीय सराफात सोन्याचे दर कमी झाले तर चांदीचे दर वाढले.
सोन्याचा दर १०९ रुपयांनी कमी होऊन ५४, ४६१ रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर ९३४ रुपयांनी वाढून ६८,५०३ रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन १,७८९ डॉलर व चांदीचा दर २३.४८ डॉलर प्रति औंस झाला.
मोतीलाल ओसवाल या संस्थेचे उपाध्यक्ष नवनीत दमानिया यांनी सांगितले की, अमेरिका व्याजदरात वाढ करण्याची शक्यता काही गुंतवणूकदारांना वाटत असल्यामुळे डॉलर आणि अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परता वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात गेल्या आठवड्याप्रमाणे आजही काही प्रमाणात घट झाली असल्याचे दिसून आले.




