कराड (पारस पवार)
पाटण विधानसभा मतदारसंघातील कामासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून ११ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्याचबरोबर पाटण येथील १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी ५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी पुरवणी अर्थसंकल्पातून मजूर झाला असून त्याबाबतची तरतूद करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या कार्यालयाकडून पत्रकाद्वारे दिली आहे.
पाटण तालुका दुर्गम व डोंगरी म्हणून ओळखला जातो. दीड वर्षापूर्वी झालेली अतिवृष्टी आणि भूस्खलन यामुळे पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील विविध मार्गाची मोठी दुरवस्था झाली होती. रस्ते खचल्याने दळणवळण धोक्यात आले होते. त्यामुळेच पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळावा, यासाठी मागील दीड वर्षापासून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. या पाठपुराव्यास यश आल्याने सामान्यांकडून त्यांना धन्यवाद दिले जात आहेत.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये मंजूर झालेल्या रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया तातडीने करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच निविदा प्रक्रिया झाल्यानंतर तातडीने मंजूर झालेल्या रस्त्यांची कामे सुरु करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.




