पुणे – सातबारा उताऱ्यावरील प्रलंबित असलेल्या वारसनोंदी, खरेदीच्या नोंदी, तक्रार नोंदी निकाली काढण्याच्या सूचना जमाबंदी आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. राज्यात मागील एक वर्षांपासून हरकत नसलेल्या व असलेल्या अशा सुमारे 8 हजार नोंदी तर पुणे जिल्ह्यात सुमारे 1 हजार सातबारा उताऱ्यावरील नोंदी प्रलंबित आहेत.
जमाबंदी आयुक्त कार्यालयाने सातबारा उताऱ्याचे संगणकीकरण पूर्ण करुन ई-फेरफार प्रणाली 2018-19 या वर्षापासून अंमलात आणली आहे.
ई-फेरफार प्रणालीत कामकाजावर देखरेख ठेवण्याच्या दृष्टिने फेरफार नोंदीची प्रलंबिता दिसण्यासाठी माहिती व्यवस्थापन प्रणाली (एमआयएस) ई-फेरफारच्या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रणालीमुळे राज्यात जिल्हानिहाय किती फेरफार प्रलंबित आहेत, याची माहिती उपलब्ध होत आहे. त्यामध्ये मागील एक वर्षांपासून किती फेरफार प्रलंबित आहेत, याची माहिती समोर आली आहे. हरकत असलेल्या व नसलेल्या नोंदी शक्यतो एक वर्षाच्या आत निकाली काढणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर सातबारा उताऱ्यावर प्रलंबित असलेले फेरफार 100 टक्के निकाली काढून तसा अहवाल कार्यालयास सादर करण्याच्या सूचना जमाबंदी आयुक्तांनी दिल्या आहेत.




