मुंबई – अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना अवकाळीच्या मुद्द्यावरुन घेरण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी विधानसभेत करण्यात आली. याच मागणीसाठी विरोधकांनी आक्रमक होत सभात्याग केला आहे. यावेळी अजित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला. शेतकऱ्यांनी नववर्ष सुरुवात करताना दुःखामध्ये साजरा करायचा का? तसेच याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणतेही गांभिर्य नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुरु असलेल्य बेमुदत संपावर बोलताना आमदार संजय गायकवाड यांनी अपमानजनक भाषेत भाष्य केले. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, या सरकारमधील लोकप्रतिनिधींना बोलताना कोणतेही तारतम्य राहिलेले नाही. एकीकडे शाळेचे पेपर चेक करण्यासाठी शिक्षक तयार नाही. अनेक ठिकाणी तर खेडोपाड्यात शिक्षक नसल्यामुळे त्या-त्या गावातील गावकऱ्यांनीच शाळा चालवायला घेतली आहे. मराठवाडा आणि विदर्भासह संपूर्ण राज्यातील शेतकरी हवालदिल झाला. अशी स्थिती आतापर्यंत मी कधी पाहिली नाही, असा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.
आमच्याही सरकारकाळात अशीच अतिवृष्टी झाली होती. त्यावेळी महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना तातडीची मदत जाहीर केली होती. पंचनामे होत राहतील, पण शेतकऱ्यांना जिथे तातडीची मदत हवी आहे, तिथे आम्ही दिली होती. असे निर्णय ‘, घेता येतात. पण त्यासाठी सरकारची इच्छाशक्ती असावी लागते. या शिंदे- फडणवीस सरकारमध्ये राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे राज्याचा शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. सगळीकडे गाररपीट होत आहे, पीक भुईसपाट झाली आहेत. पण हे पाहून सरकारला मात्र घाम फुटत नाही. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असे अजित पवारांनी म्हटले आहे.




