पुणे: “वाढत्या काेराेना रुग्णांची संख्या पाहता शासकीय आराेग्य यंत्रणेकडे किती यंत्रसामग्री, औषधे, मनुष्यबळ आहे याची नाेंद करण्यासाठी शासनाने दिलेल्या सुचनांनुसार कोविड तयारीबाबतचे काेविड पूर्वतयारीचे माॅकड्रिल पुण्यात साेमवारी पार पडले. प्रामुख्याने बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून सर्वोपचार रुग्णालय व औंध जिल्हा रुग्णालयात हे पार पडले. दरम्यान, काेविन पाेर्टलवर ताण आल्याने ते स्लाे झाले हाेते.
केंद्रीय आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ससून रुग्णालयांत येथे कोविड तयारीबाबत पाहणी (मॉकड्रिल) करण्यात आली. राज्य आराेग्य उपसंचालक डॉ. राधाकृष्ण पवार यांनी ससूनला भेट देऊन सर्व तयारीचा आढावा घेतला. यावेळी प्रभारी अधिष्ठाता डॉ. नरेश झंजाड तसेच महाविद्यालयीन परिषदेचे सर्व सदस्य उपस्थित होते.
काेराेना रुग्णसंख्या वाढल्यास लागणारे मनुष्यबळ, रुग्णालय, खाटा, व्हेंटीलेटर्स, ऑक्सिजन, रुग्णवाहिका, आरटीपीसीआर तसेच इतर तपासणीसाठी आवश्यक किट्स, रसायने, पीपीई किट्स, एन-९५ मास्क व महत्त्वाची औषधे याबाबत चर्चा केली. सध्या रुग्णालयात कोविडसाठी ११७ रुग्णालयीन खाटा उपलब्ध असून त्या सर्व खाटांसाठी ऑक्सिजनची पर्याप्त सेवा उपलब्ध असल्याचे आढळून आले.
ससून रुग्णालयात पुरेशा प्रमाणात व्हेंटिलेटर असून ते सुस्थितीत आहेत. कोविड संदर्भात प्रशिक्षण घेतलेले डॉक्टर्स, अधिपरिचारिका तसेच इतर कर्मचारी असे मनुष्यबळ पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. आवश्यक उपकरणे, ऑक्सिजन व इतर औषधे पर्याप्त स्वरूपात उपलब्ध आहेत. पाहणी पथकाने ससूनच्या काेविड पूर्व तयारीबाबत समाधान व्यक्त केले, अशी माहिती ससूनचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. नरेश झंजाड यांनी दिली.
आराेग्य संस्थांच्या सर्व ठिकाणी हे माॅक ड्रिल पार पडले. याद्वारे सद्यस्थितीत संसाधने, मनुष्यबळ, औषधे, प्रशिक्षण, संदर्भसेवा, टेलीमेडिसिन आदींची खात्री करून काेविन पाेर्टलवर भरली गेली. याबाबत औंध जिल्हा रुग्णालय व ससून हाॅस्पिटलला भेट दिली आणि याबाबत पाहणी केली.
– डाॅ. राधाकिसन पवार, आराेग्य उपसंचालक, पुणे परिमंडळ




